पुणे : हुंड्यासाठी तरुणीचा गळा दाबून तिचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणीचा चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती प्रणिल निकुडे (वय ३२), सासरे उदय (वय ६०), सासू वैशाली (वय ५५), दीर प्रतीक (वय ३०, सर्व रा. वडगाव शेरी), चुलत दीर प्रमोद, चुलत सासरे माणिक (रा. कल्याणीनगर) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २४ वर्षीय तरुणीचा आरोपी प्रणिल निकुडे याच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्यात काही वस्तू दिल्या नाही. आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे पती प्रणिलने तिला सांगितले. त्यानंतर पती प्रणिल, सासरे, उदय, सासू वैशाली, दीर प्रतीक, प्रमोद, चुलत सासरे माणिक यांनी तिला टोमणे मारुन शारिरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
त्यानंतर २५ जून रोजी तरुणीला पती प्रणिलने मारहाण केली. त्याने तिचा गळा दाबला, तसेच तिचा मोबाइल संच फोडला. तरुणीला फरफटत सदनिकेच्या गॅलरीत नेले. तिला तेथून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी सासरे उदय यांनी दिली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करत आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर शहर परिसरात विवाहितांचा छळ केल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरात पतीच्या छळामुळे एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना नुकतीच घडली होती.