पुणे : शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बिबवेवाडी, औंध, येरवडा, हडपसर भागात पादचारी महिलांचे दागिने हिसकावल्याच्या घटना घडल्या. दुचाकीस्वार चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत पादचारी महिलांकडील तीन लाख ४० हजारांचे दागिने हिसकावून नेले.
बिबवेवाडी-अप्पर इंदिरानगर भागातील व्हीआयटी स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीतील महेश सोसायटीत राहायला आहेत. त्या सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास व्हीआयटी स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरून निघाल्या हाेत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.
औंधमधील गायकवाडनगर भागात शनिवारी (२३ ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला औंधमधील गायकवाडनगर भागात राहायला आहेत. त्या शनिवारी रात्री गायकवाडनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक तोटे तपास करत आहेत.
येरवडा भागात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला २० ऑगस्ट रोजी येरवडा भागातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.
दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना प्रतिकार
हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात पादचारी महिलेकडील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गोंधळेनगर परिसरातून शनिवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी निघाल्या होत्या. त्या वेळी शिवमंदिराजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिलेने मंगळसूत्र घट्ट धरून ठेवले आणि चोरट्यांना प्रतिकार केला. मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग हिसकावून चोरटे पसार झाले. तुटलेल्या मंगळसूत्राच्या अर्धवट भागाची किंमत एक लाख रुपये असल्याची महिलेने फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मांडवे तपास करत आहेत.