पुणे : वैमनस्नयातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात घडली. टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश चिंटू आढळ (वय १९, रा. साई निवास, कोंढेवे-धावडे, एनडीए रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी करणसिंह गचंड, अमनसिंह गचंड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गचंड यांच्याशी आढळ याचा वाद झाला होता. गुरुवारी (११ सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास तो उत्तमनगर परिसरातून निघाला होता. आरोपी गचंड आणि साथीदारांनी त्याला अडवले. तू आम्हाला का भेटत नाही ? अशी विचारणा करून आरोपींनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. आमच्या नादाला लागायचे नाही’, असे सांगून आरोपींनी परिसरात दहशत माजविली. पसार झालेले आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करत आहेत.
शहरात किरकोळ वादातून दहशत माजविण्याच्या घटना वाढल्या आहे. दुचाकीला धक्का दिल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन भारती विद्यापीठ दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.