पुणे : सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारने देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पुण्यातील काही ठिकाणी मॉक ड्रिल होणार असून, नागरिकांनी या ‘मॉक ड्रिल’कडे गांभीर्याने पाहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशात संवेदनशील स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार शहरातील विधानभवन येथे, तर जिल्ह्यातील तळेगाव आणि मुळशी येथे मॉक ड्रिल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मॉक ड्रिलसंदर्भात कर्नल (नि.) प्रमोदन मराठे म्हणाले, ‘युद्ध झाल्यास शत्रूकडून हल्ले होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांसह वेगवेगळ्या स्तरांवर आवश्यक पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, परीक्षेत यश मिळवण्यासाठी भरपूर तयारी करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सराव परीक्षा द्याव्या लागतात, तसाच हा प्रकार आहे. मात्र, सध्याची स्थिती अधिक गंभीर आणि संवेदनशील स्वरुपाची आहे. युद्धाचे परिणाम खूप व्यापक आणि भयानक असतात. म्हणूनच देशभरात मॉक ड्रिल करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या मॉक ड्रिलकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शत्रू राष्ट्राकडून आपले हवाई तळ, धरणे, रेल्वेमार्ग, औद्योगिक ठिकाणे, जास्त लोकसंख्येची घनता असलेली शहरे लक्ष्य केली जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकासह निवासी सोसायट्यांपासून रेल्वे, रुग्णालये, शिक्षण संस्था, उद्योग अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करावी लागणार आहे. त्याची पूर्वतयारी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून केली जाणार आहे. या माध्यमातून काय करायचे याची नागरिकांना पूर्वकल्पना येण्यास मदत होईल.’

‘युद्धाचे परिणाम खूप वाईट असतात. मात्र, समाज सतर्क आहे का, आपत्कालीन स्थितीमध्ये एकत्रितरित्या काय करायचे याची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘मॉक ड्रिल केले जाते. पूर येणे, आग लागणे अशा स्थितींबाबतही जागरूकता निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिल केले जातात. मात्र, सध्याची संवेदनशील स्थिती लक्षात घेता होत असलेल्या“मॉक ड्रिल’कडे नागरिकांनी संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे,’ असे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सांगितले.