पुणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांकडे पुणेकरांनी पाठ फिरवली असल्याचे नोंदणीतून स्पष्ट झाले आहे, तर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कपातीच्या निर्णयामुळे दसऱ्यानंतर वाहन खरेदीत वाढ होईल, असा विश्वास वाहन विक्रेते आणि वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होते. यंदा वाहन खरेदीत काहीशी घट झाल्याचे उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. २१ ते २९ सप्टेंबर या नऊ दिवसांत ‘आरटीओ’मध्ये ९,५३१ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ८७१७ पेट्रोल, डिझेल, सीएनजी इंधनावरील, तर ८१४ इलेक्ट्रिक वाहने आहेत. गेल्या वर्षी १०,६०७ वाहने दसऱ्याच्या मुहूर्तावर घेण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये ९,५८२ सामान्य इंधनावरील, तर १,०२५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होता.

रिक्षामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १४५ रिक्षांची घट झाली आहे. यंदा केवळ ६९ रिक्षांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी २१४ रिक्षांची नोंदणी होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढली असून ३६१ मालवाहतूक वाहनांची यंदा नोंदणी झाली आहे. इलेक्ट्रिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

इलेक्ट्रिक कारला पसंती

यंदा ८१४ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही नोंदणी १०२५ होती. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकी, मालमोटर, रिक्षा यांना नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. इलेक्ट्रिक कारची मात्र नोंदणी वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारच्या नोंदणीत दुपटीने वाढ झाली आहे. यंदा नवीन १५८ इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे.

सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण आखले असून, शहरांतर्गत तसेच रस्ते, महामार्गांवर, सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग क्षमता निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. वाहनांना टोल माफी देण्यात येत असल्याने हळूहळू ही वाहने घेण्याकडे कल वाढेल. मात्र, देखभाल दुरुस्ती केंद्रांची पुरेपूर सुविधा, उपकरणांची उपलब्धता, बॅटरी खर्च यांचे नियोजन आणि सुलभता निर्माण झाली नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे, ही काळाजी गरज आहे. – प्रतापसिंग भोसले, वाहतूक अभ्यासक.

जीएसटीबाबत केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दुचाकीच्या किमती जवळपास दहा हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. यंदा वाहन खरेदीत घट झाली नसून, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये केलेल्या अचानक बदलामुळे आगाऊ नोंदणी केलेल्या अर्जांची दुरुस्ती सुरू आहे. पुढील महिन्यात याचा फरक अधिक जाणवेल. – चैतन्य सिन्नरकर, संचालक, अरिहान सुझुकी, पुणे</strong>.

वाहन वर्गनिहाय नोंदणीची तुलना

  • वाहन – २०२५ – २०२४
  • मोटरसायकल – ५,४३८- ६,३१९
  • कार – २,५५४ – २,३५४
  • रिक्षा – ६९ – २१४
  • मालवाहतूक – ३६१ – ३१६
  • टुरिस्ट टॅक्सी – १९१ – २४७
  • बस – १७ – २०
  • इतर – ८७ – ११२
  • एकूण – ८,७१७ – ९,५८२

इलेक्ट्रीक वाहने

  • वाहन – २०२५ – २०२४
  • मोटरसायकल – ६७९ – ९४४
  • कार – ११६ – ५८
  • टॅक्सी – ८ – ३
  • मालवाहतूक – ७ – १२
  • रिक्षा – ४ – ८
  • एकूण – ८१४ – १,०२५