आपल्याकडे उद्योग आले म्हणजे, पुढचे सगळे काही आपोआप होईल, अशी सर्वसाधारण धारणा असते. या धारणेचा फटका पुण्यातील उद्योगांना वर्षानुवर्षे बसला आहे. पुण्याचे भौगोलिक स्थान आणि येथे उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ या दोन गोष्टी उद्योगांना आकर्षित करणाऱ्या ठरतात. मात्र, गेल्या काही वर्षांत उद्योगांना पूरक पायाभूत सुविधा देण्यात सरकार आणि शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्या. याचमुळे कधी हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, तर कधी चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या समस्या प्रकर्षाने समोर येतात. यात खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले आणि पायाभूत सुविधा विकासाची पावले पडू लागली.
पुण्यातील तळेगाव परिसरात मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभा राहत आहे. तब्बल ३ हजार ४७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून, प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पुण्यात मालवाहतुकीसाठी एकात्मिक रस्ते, लोहमार्ग आणि हवाई मार्गांचे जाळे निर्माण होणार आहे.
देशात एकूण १५ मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क उभी राहणार आहेत. त्यात जोगीघोपा (आसाम), चेन्नई, राज्यातील नागपूर व जालना, इंदूर आणि बंगळुरू येथे ६ मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे काम सुरू आहे. याच वेळी राज्यात पुणे व नाशिक, हैदराबाद, अनंतपूर (आंध्र प्रदेश), पाटणा आणि वाराणसी येथील ६ लॉजिस्टिक पार्कची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. याबरोबर जम्मू, कोईमतूर आणि विशाखापट्टणम् येथील ३ लॉजिस्टिक पार्कची व्यवहार्यता तपासली जात आहे.
तळेगावनजीक ३३४ एकरांवर हा लॉजिस्टिक पार्क उभा राहत आहे. या प्रकल्पाची माल हाताळणीक्षमता २०३५ पर्यंत वार्षिक २ कोटी टन असेल. या पार्कच्या माध्यमातून वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, खाद्यप्रक्रिया, औषधनिर्माण, रसायने आणि धातू उद्योगाला फायदा होणार आहे. या पार्कमध्ये कंटेनर डेपो, ट्रक टर्मिनल, वाहनचालकांसाठी निवास सुविधा, रेल्वे टर्मिनल, गोदामे, शीतगृहे, ऑटो यार्ड, माल उतरविण्यासाठी आणि भरण्यासाठी सुविधा असेल. हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्णत्वास जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा एप्रिल २०२८ पर्यंत पूर्ण केला जाणार असून, दुसरा १० वर्षांत आणि तिसरा १५ वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीचा कालावधी कमी करण्यात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.
औद्योगिक क्षेत्रांपासून आयटी पार्कपर्यंत
पुण्यातील लॉजिस्टिक पार्क तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात उभे राहणार आहे. ते द्रुतगती महामार्गाने मुंबईशी जोडले जाईल. याचबरोबर मुंबई-पुणे-बंगळुरू महामार्ग, पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, वर्तुळाकार मार्ग आणि सध्याच्या लोहमार्गांच्या जाळ्यासह दिघी बंदराशी जोडले जाईल. प्रस्तावित पुरंदर विमानतळाशीही हे पार्क जोडले जाणार आहे. या पार्कच्या ६० किलोमीटर परिघात तळेगाव, चाकण, इंडोस्पेस इंडस्ट्रियल पार्क चाकण, पिंपरी-चिंचवड, खेड ही औद्योगिक क्षेत्रे आणि हिंजवडी आयटी पार्क, खेड, सीरम इन्स्टिट्यूट आणि खराडी नॉलेज पार्क आहेत.
sanjay.jadhav@expressindia.com