पुणे : मागील काही महिन्यांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका टिप्पणी करीत होते. आजवर अजित पवार यांनी कधीही लक्ष्मण हाके यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे पाहण्यास मिळाले नाही. मात्र आज पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांचा समाचार घेतल्याचे दिसून आले.

अजित पवार म्हणाले, आता काही जण कोणाच्या तरी जवळ जाण्याकरिता अजित पवार जातीवादी असल्याचे म्हणतात, सारखं काही तरी बोलत राहायचं, त्यामध्ये काहीही तथ्य नाही.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत जातीवाद माझ्या मनाला शिवणारदेखील नाही. सर्व माणसं माझ्यासाठी एकसारखी असल्याची भूमिका मांडत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष्मण हाके यांना टोला लगावला.