पुणे : पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण जागेपैकी निम्मी जागा पहिल्या टप्प्यात संपादित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सात हजार एकरपैकी सुमारे तीन हजार एकरचे क्षेत्र आता संपादित केले जाणार असून, २५ ऑगस्टपासून या गावांतील शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.

पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जाणार आहे. या विमानतळासाठी प्रकल्पाला जागा देण्यासाठी सात गावांतील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. हा विरोध लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने जागेचे संपादन करण्याचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुरंदरच्या उपविभागीय कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची संमतीपत्रे स्वीकारली जाणार आहेत.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पारगाव मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या सात गावांमधून २८३२ हेक्टर जमीन संपादन करण्याचे नियोजन होते. या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) २८३२ हेक्टर जमीन संपादन करण्याचे पूर्वी प्रस्ताव दिला होता. आता शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हे क्षेत्र कमी करण्याचा इरादा जाहीर केल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून एकूण प्रस्तावित २८३२ हेक्टरपैकी १२८५ हेक्टर म्हणजेच सुमारे तीन हजार एकर जागा संपादित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारपासून (२५ ऑगस्ट) सात गावांतील शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेण्यास सुरुवात कऱण्याचे ठरविले आहे. विमानतळासाठी जमीन देणाऱ्यांना बाजारभावानुसार चार पट मोबदला देण्याचे नियोजन आहे. जे जमीन देण्यासाठी संमती देणार आहे, त्यांना जमिनीचा परतावा देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. संमती सुरुवातीला किंवा शेवटी दिली, तरी सर्व शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम सारखीच मिळणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची संमतीपत्रे येत्या सोमवारपासून घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. संमतीपत्रे देण्यासाठी २१ दिवसांची मुदत असणार आहे. प्रथम संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी यामध्ये जागा देऊन मोबदला घ्यावा.