पुणे: पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे,अशी मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शविला होता. मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले होते. त्या सर्व घडामोडींदरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खडकवासला येथील एनडीएच्या प्रांगणात बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी पेशव्यांचे दहावे वंशज पुष्कर सिंह पेशवे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम होऊन काहीच दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.

त्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांतील घडामोडींबाबत पुष्कर सिंह पेशवा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खडकवासला येथील एनडीएच्या प्रांगणात बाजीराव पेशवे यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याबाबत खूप आनंदी आहे आणि एक समाधानाची बाब आहे. मी या कुटुंबातील एक सदस्य आहे. बाजीराव पेशवे यांचे पुतळे फार कमी प्रमाणात उभारण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पुतळे उभारले गेले पाहिजे. जेणेकरून पुढील पिढीला इतिहास समजू शकेल, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, आपल्या देशातील अनेक रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट यांना सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांची नावे आहेत. त्यामुळे आपल्या येथील पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यास काहीही हरकत नाही. तसेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा विषय समोर आणला ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी एक धाडस लागतं आणि मेधा कुलकर्णी यांनी धाडस दाखवलं आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांची सेवा करून पेशव्यांनी १०० वर्ष देशाला वाचविण्याचे काम केले आहे. पेशव्यांनी स्वत:ला कधीच राजा म्हणून घेतले नाही. प्रधान म्हणूनच कायम राहिले. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे , अशी मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे त्यांनी केली.

पेशव्यांच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा

आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला कायम मुघलांबाबत शिकवले गेले आहे. त्याच कालावधीत आमच्या पुस्तकात लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर यांच्याबाबत एक-एक पान एवढीच माहिती देण्यात आली. तर दुसर्‍या बाजूला मी ज्या कुटुंबामधून आहे त्याचा एक इतिहास आहे. जवळपास देशासाठी १०० हून अधिक वर्ष सेवा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यासह आजवर झालेल्या पेशव्यांच्या कार्याबाबत शालेय पाठ्यपुस्तकाच्या माध्यमांतून इतिहास समोर आला पाहिजे, जेणेकरून पेशव्यांनी पुण्यासाठी आणि देशासाठी केलेले कार्य पुढील पिढीला समजण्यास मदत होईल अशी मागणी देखील पुष्कर सिंह पेशवा यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळाची दुरवस्था, पुणे महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज

कात्रजचा तलाव, लकडी पूल यांसह अनेक मोठी कामे नानासाहेब पेशवे यांनी त्याकाळी पुण्यासाठी करून ठेवली आहेत. आज देखील पूल आणि तलाव सुस्थितीत आहे. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. नानासाहेब पेशवे यांचे समाधी स्थळ नदी पात्रालगत आहे. आज या समाधी स्थळाची अवस्था पाहून खूप वाईट वाटते ते म्हणजे नदी पात्रात समाधी असून त्याच्या आजूबाजूला म्हशीची गोठा, सांडपाणी साचते, पावसाळ्यात पाण्याने त्या परिसरात पाणीच पाणी होऊन जाते. त्यामुळे या समाधी स्थळाकडे पुणे महानगरपालिकेने लक्ष घालून तेथील डागडुजी आणि कायम स्वरूपी साफसफाई करावी, अशी मागणी देखील पुष्कर सिंह पेशवा यांनी केली.