काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे घुसून भिंतीवर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत ‘माफीवीर जवाहरलाल नेहरू’ अशा मजकुराचे स्टीकर लावले. तर राहुल गांधी यांच्या फोटोला काळ फसवून निषेध नोंदविला.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर म्हणाले की, स्वा.सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेले विधान निषेधार्थ असून यातून राहुल गांधी यांची विकृती दिसून येत आहे. आज आम्ही काँग्रेस भवन येथे घुसून माफीवीर जवाहरलाल नेहरू हे स्टीकर लावले. नेमके त्यावेळी काय घडले होते. हे यामधून आम्ही सर्वांना दाखवित आहोत. त्यामुळे यापुढे देखील आमचा लढा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- पुणे: …अन् ती महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली; शिंदे गटाच्या आंदोलनातील Video चर्चेत
भ्याड आंदोलनाचा आम्ही निषेध
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, आज काँग्रेस भवन येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन भ्याड पद्धतीच आहे. आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. आता आम्ही या आंदोलनकर्त्यां विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते सचिन आडेकर यांनी दिली.