राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे ही भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो यात्रा आहे. समाजात फूट पाडण्याच काम राहुल गांधी करत आहेत असा घणाघात सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी खिळखिळा झालेल्या काँग्रेसवर लक्ष द्यावे. काँग्रेसची अवस्था ही घर का ना घाट का अशी झाली आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मनसेला सोबत घेणे हे भाजपला न परवडणारे आहे. राज ठाकरे यांच्या भूमिका या वादग्रस्त ठरलेल्या आहेत असा उल्लेख करत त्यांनी भाजपला मनसे सोबत युती न करण्याचा सल्ला दिला आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्यावर टीका करून कोणाच्या भावना दुखवू नयेत. वैचारिक , मतभेद असू शकतात,अशी टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस पक्ष जोडण्याच काम करावं, काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे त्याला मजबूत करण्याच काम करावे. राहुल गांधींच्या यात्रेत लोक गर्दी करत आहेत पण अशी गर्दी जमत असते. याच मतात परिवर्तन होईल अस अजिबात वाटत नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोक जमा होत आहेत पण याचा फटका आम्हाला बसणार नाही.

हेही वाचा: वीर सावरकर वक्तव्याप्रकरणी शिंदे गटाचा निषेध मोर्चा, मुंबईत राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी

पुढे ते म्हणाले की, आगामी गुजरात निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळेल. आम आदमी पार्टी यांच्या वादात भाजपचा फायदा होणार आहे. पुढे ते म्हणाले की, मनसे भाजप युतीला माझा विरोध आहे, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका ह्या अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना सोबत घेणं भाजपला न परवडणारं आहे. मी सोबत असताना राज ठाकरे यांची आवश्यकता नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटांसोबत युती करून आम्ही निवडणूक लढणार आहे. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळेल. आम्ही एकनाथ शिंदेंचा पाठीशी आहोत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi work to divide the society criticism of ramdas athawale pimpri chinchwad tmb 01 kjp
First published on: 19-11-2022 at 13:18 IST