लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसंदर्भात (ट्रॅक) राज्य सरकार सोबत घेण्यात येईल. त्यातून मार्ग काढण्यात येईल. लवकरच प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वे गाड्या दोन मार्गिकेवरून धावत आहेत. या मार्गावर तिसर्‍या आणि चौथ्या मार्गिकेस २०१७ मध्ये मान्यता मिळाली आहे. याबाबतचा सर्व्हेही झाला आहे. मार्गिका उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे. परंतु, सात वर्षे होत आले, मात्र अद्यापही काम सुरू झाले नाही. या मार्गिकेचे काम झाल्यानंतर लोकल आणि एक्स्प्रेसही धावतील. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फायदा होईल. पुणे ते मुंबई असा दररोजचा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर यासंदर्भात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

आणखी वाचा-एकही पैसा खर्च न करता ससूनचे मासिक वीज बिल एक कोटी रुपयांवरून ५० लाखांवर येणार! या अनोख्या प्रयोगाविषयी जाणून घ्या…

दरम्यान, पुणे आणि मुंबई दरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. त्यात नोकरदार, व्यापारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लोणावळा आणि कर्जत दरम्यान रेल्वे गाडी चालण्यासाठी दोन इंजिनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथे टनेलची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात येथून लांब पल्ल्याच्या, एक्स्प्रेस आणि लोकलही धावू शकतील. त्यामुळे लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्राचे सर्वेक्षण करावे. टनेल निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी धोरण ठरवा; आमदार महेश लांडगे यांची अधिवेशनात मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सद्यस्थितीत दहा लाख लोक राजस्थानशी संबंधित आहेत. या लोकांना व्यवसाय, कौटुंबिक कामासाठी राजस्थानला जावे लागते. परंतु, सध्या या मार्गावर सात दिवसातून एकदा रेल्वे धावत आहे. या रेल्वेला चिंचवड स्थानकावरला थांबा देखील नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापारी, विद्यार्थी, कामगार, पर्यटक यांच्यासाठीही या मार्गावर नियमितपणे रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे-जोधपूर ही सात दिवसांनी धावणारी रेल्वे दररोज सुरू करावी. चिंचवड स्टेशनवर थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.