संजय जाधव

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील समस्या वर्षानुवर्षे तशाच आहे. रेल्वेकडून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही. पुणे रेल्वे स्थानकातील लिफ्ट, सरकता जिना (एस्केलेटर), पिण्याचे पाणी यांसारख्या सुविधांवर अजूनही सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. जागतिक दर्जाची सेवा देण्याकडे वाटचाल करीत असल्याचा दावा करणाऱ्या रेल्वेकडून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे.

पुणे विभागातील विभागीय रेल्वे सल्लागार समितीची तिसरी बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात झाली. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी पुणे स्थानकावरील लिफ्टचा रखडलेला प्रस्ताव, वारंवार बंद पडणारे एस्केलेटर आणि बंद पडलेल्या वॉटर व्हेंडिंग मशिन, बंद अथवा नादुरूस्त असलेले सीसीटीव्ही आणि पार्किंग समस्येचा पाढा वाचला. प्रत्यक्षात या समस्या अनेक वर्षांपासून असून, त्यावर तात्पुरती मलमपट्टी रेल्वेकडून केली जात आहे. कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यामुळे प्रवाशांसाठी मूलभूत स्वरूपाच्या असलेल्या या सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरलेले आहे.

हेही वाचा >>>> पुणे : कोयता गँग पुन्हा सक्रिय; पर्वती पायथा भागात तरुणावर हल्ला

रेल्वे प्रशासनाकडून या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. यासाठी रेल्वेचे अधिकारी वरिष्ठ कार्यालयांकडे बोट दाखवतात. वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी मिळाल्याशिवाय काम करता येत नसल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. परंतु, या सगळ्या गोंधळात प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. जागतिक दर्जाच्या नव्हे तर अगदी सामान्य सुविधाही रेल्वेकडून प्रवाशांना मिळताना दिसत नाहीत. पुणे – फलटण डेमूचा विस्तार करणे, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पिंपरी आणि चिंचवड स्थानकासाठी स्वतंत्र बोगी उपलब्ध करून देणे, चिंचवड स्थानकावर पुणे-मुंबई इंद्रायणी, प्रगती, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मीला थांबा, विविध प्रवाशी सुविधांचा विकास यावर बैठकीत सदस्यांनी चर्चा केली. या मागण्याही मागील काही काळापासून होत आहेत. त्यांचीच पुनरावृत्ती बैठकीत करण्यात आली.

हेही वाचा >>>> खळबळजनक: प्रेमी युगलाला रिक्षात अश्लील चाळे करताना हटकले, प्रियकराने रिक्षा चालकाची केली हत्या

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे होत्या. बैठकीचे सूत्रसंचालन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी केले. या बैठकीला सदस्य निखिल काची, अजित चौगुले, विनीत पाटील, शेषमल ओसवाल, बशीर सुतार, श्रीनिवास शर्मा, तानाजी कराळे, आप्पासाहेब शिंदे, किशोर भोरावत, दिलीप बटवाल, शिवनाथ बियाणी, अनेक शाखा अधिकारी आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.रामदास भिसे आदी उपस्थित होते.

गाड्या सुरक्षित आणि वेळेवर धावणे, लोहमार्गांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. पुणे रेल्वे प्रशासन प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापिका

काही समस्या प्रलंबित आहेत. आधीचे अधिकारी उदासीन असल्यामुळे त्या सुटल्या नव्हत्या. आताच्या अधिकाऱ्यांचा समस्या सोडवण्यावर भर आहे. पूर्वी वर्षाला सल्लागार समितीच्या चारपैकी दोन-तीन बैठक व्हायच्या. आता नियमितपणे बैठका होत आहेत.

– निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती