पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर लोणावळा रेल्वे स्थानकाच्या अलीकडे मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान रेल्वेची ओव्हरहेड वायर सोमवारी तुटली. यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा सायंकाळी विस्कळीत झाली. कामशेत ते मळवली या स्थानकांच्या दरम्यान ओव्हरहे़ड वायर तुटल्याचे एका रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले. ही घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास समोर आली.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड : स्पा सेंटरवर छापा, चार तरुणींची सुटका

या चालकाने याची माहिती तातडीने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तांत्रिक ब्लॉक घेऊन या मार्गावरील गाड्या थांबवल्या. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास  सुमारे दोन तासांचा कालावधी लागला. त्यामुळे या मार्गावरील ६ एक्स्प्रेस गाड्या आणि ३ लोकल गाड्यांना विलंब झाला. याबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे म्हणाले की, लोणावळा ते पुणे या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे काही काळ रेल्वे सेवेला फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून, सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. या बिघाडामुळे गाड्यांना विलंब होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल रेल्वे दिलगिरी व्यक्त करते.