पुणे : रेल्वे इंजिनांची डिजिटल गणना करण्याचा प्रयोग रेल्वेने केला आहे. या गणनेत इंजिनाचे तपशील, ठिकाण, प्रकार, भौगोलिक स्थिती, छायाचित्रे आदी गोष्टींची माहिती जमा करण्यात आली. यातून रेल्वेला भविष्यात या इंजिनांचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येणार आहे.
देशभरात रेल्वेच्या १७ प्रादेशिक विभाग आणि ६८ विभागांमध्ये एकाच वेळी ही डिजिटल गणना करण्यात आली. त्यात देशभरातील १६ हजार इंजिनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. पुणे विभागात १३१ इंजिनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या गणनेत इंजिनचा क्रमांक, शेड, प्रकार, भौगोलिक स्थिती, छायाचित्रे आदी माहिती प्रत्यक्ष पद्धतीने एकाच वेळी संकलित करण्यात आली. पुणे विभागात ही गणना सुमारे तीन तास चालली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.
हेही वाचा – बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
डिजिटल गणनेमुळे आता कोणते इंजिन कुठे आहे आणि त्याचा तपशील मिळणे शक्य होईल. त्यामुळे गरजेनुसार कुठे इंजिन उपलब्ध आहे, ते कळेल. त्यातून इंजिनाचा पूर्ण क्षमतेने वापर करता येईल. मालगाड्यांच्या विचार करता मालाच्या प्रकारानुसार त्यांना वेगवेगळ्या क्षमतेचे इंजिन लागते. सर्व इंजिनांची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने योग्य इंजिन जवळच्या ठिकाणाहून मिळविणे शक्य होईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
मालडब्यांच्या गणनेतून फायदा
रेल्वेने मागील वर्षी देशभरात मालडब्यांची डिजिटल गणना केली होती. त्यात तीन लाखांहून अधिक मालडब्यांची माहिती संकलित करण्यात आली. त्यातून रेल्वेला मालगाड्यांचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य झाले. त्यामुळे मालवाहतुकीची क्षमता आणखी वाढून रेल्वेला फायदा झाला.
रेल्वे इंजिनची किंमत १० ते ३० कोटी रुपयांदरम्यान असते. त्यांचे जास्तीत जास्त आयुष्य ३६ वर्षे असते. त्यामुळे इंजिनाचे आयुर्मान संपण्याआधी त्याचा अधिकाधिक वापर करण्यावर रेल्वेकडून भर देण्यात येतो – सचिन पाटील, सहायक विभागीय परिचालन व्यवस्थापक