कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागांत पाऊस ओसरणार असून, पुढील काही दिवस तो विश्रांती घेईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सोमवारी (६ जुलै) विदर्भ आणि मराठवाडय़ातील तुरळक भागात जोरदार पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठय़ा पावसाची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी चोवीस तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे.

सध्या गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागांत सर्वच ठिकाणी आणि प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यंमध्ये पाऊस कायम राहणार आहे.

कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर ओसरत चालला आहे. घाटमाथ्यांवरही पाऊस कमी झाला आहे. ८ ते १० जुलै या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

मराठवाडय़ात मात्र पावसाने दडी मारली होती. चोवीस तासांमध्ये बेलापूर येथे २१० मि.मी. ठाण्यात १६० मि.मी. कल्याण, मुंबई, पालघर, उल्हासनगर, अंबरनाथ आदी भागांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. विदर्भातील भंडारा येथे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain elsewhere except konkan abn
First published on: 07-07-2020 at 00:27 IST