पावसाने राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा जोर धरला असून, कोकण, सह्य़ाद्रीचे घाटमाथे आणि मध्य महाराष्ट्रात त्याची तीव्रता अधिक होती. पुढील दोन दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील धरणांमधील साठा ३५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रात महाराष्ट्र व कर्नाटक किनाऱ्यालगतच असलेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याला रविवारपासून सुरूवात झाली. सोमवारीसुद्धा बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. विशेषत: धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटमाथ्यांवर पावसाने चांगलीच हजेरी लावली. सोमवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ताम्हिणी येथे १९० मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय लोणावळा (१६० मिलिमीटर), कोयना (१६०), भीरा (१४०), महाबळेश्वर (१३०), पालधर (१९०), बेलापूर (१८) येथेही मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर सोमवारी दिवसभरात ठिकठिकाणी संततधार पाऊस झाला. त्याची नोंद अशी (मिलिमीटरमध्ये)- पुणे ४, अहमदनगर, २, कोल्हापूर ११, महाबळेश्वर ५१, नाशिक २३, सांगली ३, सातारा ५, सोलापूर १, मुंबई १०, अलिबाग ८, रत्नागिरी ७, डहाणू ४५, उस्मानाबाद ९, औरंगाबाद ११, नांदेड ३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातील धरणसाठा ६४ टक्के,
मराठवाडय़ात निव्वळ १५ टक्के
पावसामुळे कोकण, पुणे नागपूर विभागातील धरणांमधील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली. कोकणातील धरणे ६४ टक्के भरली आहेत. याशिवाय नागपूर (५६ टक्के), अमरावती (४०), पुणे (३८) या विभागांमधील धरणांच्या साठय़ातही चांगली वाढ झाली. मात्र, नाशिक विभागातील धरणांमध्ये केवळ २० टक्के, तर मराठवाडा विभागातील धरणांमध्ये इनमीन १५ टक्के पाणी शिल्लक आहे. कोयना धरण निम्म्याहून अधिक भरले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain monsoon dam water storagge
First published on: 29-07-2014 at 02:50 IST