पुणे : ऐन मे महिन्यात पावसाचे सत्र सोमवारीही कायम राहिले. शहरात ठिकठिकाणी जोरदार सरी बरसल्या. रात्री आठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे १४ मिलीमीटर, तर लोहगाव येथे ३९.८ मिलीमीटर पाऊस पडला.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवामानात बदल झाला आहे. कधी ऊन, तर कधी ढगाळ, तर कधी पाऊस असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. सोमवारीही शहरासह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सहानंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. शिवाजीनगर, पाषाण, औंध, कात्रज, नगर रस्ता या भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते.

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत सर्वाधिक ३९.८ मिलीमीटर पाऊस लोहगाव परिसरात झाला. तसेच शिवाजीनगर येथे १४, लवळे येथे ११, कोरेगाव पार्क येथे पाच, चिंचवड येथे दोन, एनडीए येथे १.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रावर उच्च स्तरावरील चक्रीय वारे वाहत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत असल्याने पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुण्यासह सातारा परिसरातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.