पुणे : र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला, तरी ते दोन-तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली. या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, शनिवारी (२८ मे) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे. या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून, ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन-तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील, असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

दक्षिण अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे सध्या केरळसह दक्षिणेकडील काही भागांत आणि किनारपट्टीवर जोरदार पाऊस होत आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येही सध्या पावसाळी स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण होत आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, कोकण आणि विदर्भात काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली आहे. ३० मेपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain thunderstorms state monday nutritious environment seasonal wind travel ysh
First published on: 29-05-2022 at 00:02 IST