पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसात काही रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. आयटी पार्कचे रूपांतर वॉटर पार्कमध्ये होण्याची ही या महिन्यातील तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे, शासकीय यंत्रणांकडून गेल्या आठवड्यापासून विविध उपयोजना सुरू असूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची मागणी आयटीयन्स करू लागले आहेत.

पुणे आणि परिसरात गेल्या २४ तासांपासून मुसळधार सुरू आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये जोरदार पाऊस सकाळपासून सुरू आहे. यामुळे आयटी पार्कमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आयटी पार्कमधील रस्त्यांना नद्यांचे रूप आले असून, यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे. याबाबतच्या चित्रफिती आणि छायाचित्रे आयटीयन्स समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात टाकत आहेत.

सरकारी यंत्रणांकडून आयटी पार्कमधील विविध उपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यात पावसाच्या पाण्याचा निचरा आणि रस्ते दुरुस्ती यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संयुक्तपणे अनेक बैठका आणि पाहणी करून उपाययोजनांचे नियोजन केले आहे. या उपाययोजना सुरू करूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती बिकट आहे.

पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे आयटीयन्सनी वर्क फ्रॉम होमची मागणी सुरू केली आहे. वाहतूक कोंडीत दररोज चार ते पाच तासांचा वेळ वाया जाणार असेल तर घरून काय काम काय वाईट असा प्रश्नही ते उपस्थित करीत आहेत.

आयटी पार्कमधील नागरिकांच्या समस्या

खड्डेमय आणि चिखलाने भरलेले रस्ते
वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर
वायू प्रदूषणात सातत्याने वाढ
टँकरमाफियांकडून नागरिकांची लूट
तुंबलेल्या सांडपाणी वाहिन्या
सगळीकडे पडलेले कचऱ्याचे ढीग
कंपन्यांतून सांडपाणी थेट बाहेर
बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे

हिंजवडी आयटी पार्कमधील नागरी समस्यांमुळे पुण्याचे नाव जगभरात खराब होत आहे. आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्याचा समावेश पिंपरी चिंचवड महापालिकेत करावा. याचबरोबर आयटी पार्कमधील समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. – प्रशांत गिरबणे, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, ॲग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीज

हिंजवडी आयटी पार्क टप्पा दोन आणि तीन मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. एक तर शासकीय यंत्रणांनी ही समस्या पूर्णपणे सोडवावी अथवा आयटी कंपन्यांवर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सक्ती करनी. – फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.