महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी पुण्यातील पक्षाच्या मोठ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला मनसे नेते वसंत मोरे यांच्यासह हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांना अजित पवार नावाचा मनसे कार्यकर्ता भेटला. हा कार्यकर्ता मूळचा बारामतीतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील बारामतीचेच आहेत. अजित पवार नावाच्या मनसे कार्यकर्त्याला पाहून राज ठाकरे यांना आधी हसू आलं. तसेच त्यांनी या भेटीवर प्रतिक्रियादेखील दिली.

राज ठाकरे म्हणाले, आमचा वसंत मोरे खूप शिस्तीने काम करणारा सहकारी आहे. त्याने उत्तमरित्या मतदारसंघाची बांधणी केली आहे. बारामती मतदारसंघ वसंतकडे आहे. याच मतदारसंघात आम्हाला अजित पवार सापडावा? त्याला पाहून मला कळेना हल्ली हे कुठल्याही पक्षात जातात की काय? परंतु, हा आपल्याबरोबरचा सहकारी आहे. यावेळी राज ठाकरे अजित पवारला (मनसे कार्यकर्ता) म्हणाले, फक्त आयुष्यात मला कधीही काका म्हणू नकोस.

हे ही वाचा >> सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, “माझ्याविरोधात कोणीतरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, निवडणुका तोंडावर आहेत. महापालिकांच्या निवडणुका कधी होणार हे कोणालाच माहिती नाही. मी चौकशी केल्यावर सांगितलं गेलं की आता थेट २०२५ ला या निवडणुका होतील. आपल्या देशात नेमकं काय चाललंय तेच कळत नाहीये. परंतु, लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होईल. त्यामुळे सगळ्यांनी तयारीला लागा. राज्याच्या राजकारणाचा जो काही विचका झाला आहे, यातून महाराष्ट्राला बाहेर काढूया. आपण शपथ घेऊया आणि महाराष्ट्राला यातून बाहेर काढूया. देशात सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, जनतेला गृहित धरलं जात आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.