संरक्षण क्षेत्रात २०१४ पर्यंत ९०० कोटींची निर्यात होत होती. त्यानंतर स्वदेशी बनावटीचा काळ सुरू झाला. आता निर्यात १५ हजार कोटींवर गेली आहे. २०२७ पर्यंत ३५ ते ४० हजार कोटींवर निर्यात जाईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी व्यक्त केला. सिम्बायोसिसतर्फे आयोजित फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ‘राष्ट्र उभारणीत तरुणांचे योगदान’ या विषयावर राजनाथ सिंह बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक ब्रिगेडियर डॉ. राजीव दिवेकर आदी या वेळी उपस्थित होते. व्याख्यानापूर्वी नव्या निवासी इमारतीचे उद्घाटनही सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा >>> राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये: हिंदू महासंघाचे आनंद दवे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजनाथ सिंह म्हणाले, की व्यवस्थापन भारतीय ज्ञान परंपरेतील अविभाज्य अंग आहे. भारतीय शास्त्रांमध्ये त्याबाबत गांभीर्याने चर्चा केली गेली आहे. तसेच प्राचीन ग्रंथांत ताण व्यवस्थापन, नेतृत्व गुण, संघटन कौशल्यांबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. आधुनिक ज्ञानाबरोबर प्राचीन ज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यातून आत्मविश्वास निर्माण होईल. संस्थेतील काम परिणामकारक आणि सुनियोजित करण्यासाठी व्यवस्थापन उपयुक्त ठरते. जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या शाखांमध्ये व्यवस्थापन एक आहे. सरकारने तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, बँकिंग, नवउद्यमी, डिजिटल सुविधा अशा क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. ‘तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले सरकारने टाकली आहेत. त्याचा लाभ घेऊन तरुणांनी सरकारच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे. देशाने आता कुठे पंख पसरायला सुरुवात केली आहे. भविष्यात तरुण आभाळ कवेत घेतील. तरुणांमध्ये अणूऊर्जेसारखेच असीम ऊर्जेचे भांडार असते. मात्र ऊर्जेला आकार आणि दिशा नसते. त्यामुळे तरुणांच्या ऊर्जेचा राष्ट्र उभारणीत उपयोग होण्यासाठी देशाची संस्कृती, परंपरा, सांस्कृतिक मूल्ये तरुणांच्या ऊर्जेला दिशा देतील. व्यवस्थापनाचे विद्यार्थी हे संपत्ती निर्माते आहेत. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांची देशाच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका राहणार आहे,’ असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.