पुणे : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने दिलेल्या लवचिकतेचा वापर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रामायणावर आधारित एक-दोन क्रेडिटचे अभ्यासक्रम सुरू करावेत. तसेच आपला वारसा विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठीही अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करायला हवेत.’ अशी सूचना भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्यशास्त्र विभाग आणि मिहाना पब्लिकेशन्स यांच्या वतीने डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ‘रामायण – भारतीय सभ्यतेचा आत्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे, ‘आयुष’चे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे, लेखक रामचंद्र मुटाटकर, प्रकाशक अमृता कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
सहस्रबुद्धे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना आपला वारसा माहीत होण्यासाठी रामायणावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात; तसेच विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनासाठी रामायणावर आधारित अभ्यासक्रम सुरू करायला हवेत.’
‘डाव्या विचारवंताकडून भारत हा एक देश नाही, तर ते ब्रिटीशांनी निर्माण केलेले राजकीय ऐक्य आहे, अशीच मांडणी केली जाते. मात्र, रामायण हे भारतीय जीवनात-संस्कृतीशी एकरूप झालेले दिसते. देशाच्या वेगवेगळ्या भागात तेथील स्थानिक संस्कृतीवर रामायणाचा प्रभाव दिसतो. रामायण हा खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.’ असेही सहस्रबुद्धे म्हणाले.
‘रामायण हे अनेक देशांना जोडते. आशिया-अफ्रिका खंडातील वेगवेगळ्या देशांत रामायणातले संदर्भ सापडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे सांस्कृतिक धाग्याने जोडलेल्या देशांची संघटना स्थापन करायची असेल, तर रामायण-महाभारताचा उपयोग करता येऊ शकतो,’ असेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
‘मेकॉलेप्रणीत शिक्षणाने निर्माण झालेल्या धारणा तपासून देशाच्या शिक्षण व्यवस्थेत स्वातंत्र्यानंतर लगेच बदल करण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र, तसे झाले नाही आणि इंग्रजांनी लादलेलीही व्यवस्था सुरूच राहिली. शिक्षणात स्वदेश, स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांना महत्वाचे स्थान मिळाले नाही. आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने हा ७५ वर्षांचा अनुशेष भरून निघाला आहे.’ असे असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
‘ज्ञानाला कर्माची आणि कर्माला सत्याची जोड हा भारतीय सभ्यतेचा आत्मा आहे. आपले प्रशासक आजही मॅकोलेचा वारसा चालवतात. मात्र, त्यांना राम, श्रीकृष्णाचा वारसा माहिती नाही,’ अशी खंत लीना मेहंदळे यांनी व्यक्त केली.