पुणे : विविध प्रकारचे चिवडे एकत्रित करून त्यावर बारीक चिरलेला कांदा यांचेे मिश्रण असलेला नावीन्यपूर्ण चवीचा चिवडा देणारे ‘रामचंद्र भगवंत चिवडेवाले’ दशकभराच्या विश्रांतीनंतर खवय्या पुणेकरांच्या सेवेत दाखल झाले. ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अनिल अवचट यांच्या लेखणातून प्रसिद्ध झालेले, शंभर वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करणारे रामचंद्र भगवंत चिवडेवाले पूर्वीच्या रतन चित्रपटगृहासमोरील हातगाडीवरून आता तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील दुकानामध्ये स्थिरावले आहेत.
रामचंद्र घाटगे यांनी १९०७ मध्ये या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी एक पैसा, दोन पैसे असे चिवड्याचे दर होते. हा अनोख्या चवीचा चिवडा पुणेकरांच्या इतका पसंतीस उतरला, की आडनाव लुप्त होऊन ‘रामचंद्र भगवंत चिवडेवाले’ या नावानेच ते प्रसिद्ध झाले. त्यांचे पुत्र रंगनाथ रामचंद्र घाटगे यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला. त्या काळात दहा पैसे आणि पंधरा पैसे अशी चिवड्याची किंमत होती. रामचंद्र भगवंत यांचे नातू उल्हास यांनी नोकरी सांभाळून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली.
प्रसिद्ध लेखक अनिल अवचट हे या चिवड्याचे चाहते. एका दिवाळी अंकासाठी त्यांनी रामचंद्र भगवंत चिवडेवाले यांच्यावर व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिला होता. त्यामुळे व्यवसायाला प्रसिद्धी लाभली. पुढे अवचट यांच्या ‘आप्त’ पुस्तकामध्ये या लेखाचा समावेश करण्यात आला. ‘फरासखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात २०१५ मध्ये बाॅम्बस्फोटाची घटना घडली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव व्यवसायाची गाडी बंद करावी लागली,’ अशी माहिती उल्हास घाटगे यांनी दिली.
‘सन १९७३ पासून म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर मी गाडीवर येऊन वडिलांना मदत करत असे. नोकरी लागल्यानंतर कामावरून थेट चिवडा करण्यासाठी येत होतो. त्या वेळी जिल्हाधिकारी असलेले श्रीनिवास पाटील आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे हे अनेकदा चिवड्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असत. आमच्या चिवड्याचे शौकीन असलेल्या अनेकांनी आग्रह केल्यामुळे दशकभराच्या विश्रांतीनंतर व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याचे ठरविले,’ असे घाटगे यांनी सांगितले.
असा आहे चिवडा…
‘दगडी पोहे तळून केलेला चिवडा, वाळविलेल्या कांद्याचा चिवडा, जैन चिवडा, मक्याचा चिवडा, तिखट शेंगदाणे, नाॅयनलाॅन पोह्याचा चिवडा आणि आपण न्याहरी करतो ते पोहे यांच्या एकत्रित मिश्रणावर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू पिळून चिवडा केला जातो. हे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे घरीच तयार केले जातात. हे काम दिवसभर पुरत असल्याने व्यवसायाची वेळ सायंकाळी पाच ते रात्री नऊ अशी आहे,’ असे उल्हास घाटगे यांनी सांगितले.