केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चौफेर फटकेबाजी करत शिवसेनेला घेरलं. शरद पवार यांच्यावर टीका करताना मात्र आठवले यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. शरद पवार नाही, तर राष्ट्रवादीचे खालचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात. शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला असून देवेंद्र फडणवीस यांना धोका दिल्याचा आरोप आठवलेंनी केला. काँग्रेसच्या आमदारांचा वारंवार अपमान होतोय त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावून भोंगे वाजवावेत या मताला त्यांनी विरोध दर्शविला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “आमची इच्छा आहे हे सरकार पडावं, पण कुठला पक्ष फुटेल असं दिसत नाही. काँग्रेस पक्षातील बरेच आमदार नाराज आहेत. ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत त्यांचा वेळोवेळी अपमान होतोय. त्यांना निधी मिळत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच हे सरकार चालवत आहेत. त्यांच्याकडून काँग्रेसला सत्तेतून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे. अशा सरकारमध्ये काँग्रेसने राहू नये. लवकरात लवकर पाठिंबा काढला पाहिजे. काँग्रेसला विनंती आहे की सरकारमधून बाहेर पडावं.”

“राज ठाकरे यांच्या ‘या’ मताशी मी सहमत नाही”

“मशिदीचे भोंगे हे परंपरागत आहेत. तेच पुढे सुरू आहे. मशिदीसमोर भोंग्यावर हिंदूंची हनुमान चालीसा लावू नये. ते मंदिरात लावावेत, त्याला हरकत नाही. एकमेकांसमोर भोंगे लावू नयेत. मशिदीसमोर भोंगे वाजवावेत या राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत नाही, असं आठवले म्हणाले.

“शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण…”

रामदास आठवले पुढे म्हणाले, “शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात. २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे दंगल झाली. तेथील सरपंच राष्ट्रवादीचे होते, तिथे हल्ले झाले. हल्ल्यामागे राष्ट्रवादी नाही, पण राष्ट्रवादीत काम करणाऱ्या अनेकांचा त्यात सहभाग होता, अशी माहिती आमच्याकडे आहे. शरद पवार यांनी आदेश दिला म्हणून असं केलं असं आमचं मत नाही. खालच्या पातळीवर राष्ट्रवादी जातीपातीचे राजकारण करते हे खरं आहे.”

“शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला”

“मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले, हे योग्य नाही. राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांबद्दलची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने अजूनही विचार करायला हवा,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले, “तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा, फक्त आधी अमित ठाकरेंना…”

“राज ठाकरे यांनी भाजपासोबत येऊ नये कारण…”

“मुख्यमंत्रीपदाच्या अडीच-अडीच वर्षे फॉर्म्युल्यावर भाजपा-शिवसेनेचं एकमत होऊ शकतं. काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर करण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत येणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ ची निवडून जिंकू अशी आशा आहे. राज ठाकरे यांनी भाजपासोबत येऊ नये. त्यांचं नुकसान होईल. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, परंतु मतं मिळत नाहीत,” असं म्हणत आठवलेंनी राज ठाकरेंना टोला लगावला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.