पिंपरी-चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहराची सांस्कृतिक, समृद्धीची पंढरी म्हणून ओळख ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ अशा महोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होण्यास मदत होत आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी- चिंचवड महापालिका शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम करीत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सव २०२५ निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, माजी उपमहापौर राजू मिसाळ, पैस कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक प्रभाकर पवार, अमृता मुळे, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार व रसिक श्रोते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेल्या संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये टेल्को कलासागर – टाटा मोटर्स पुणे, कलापिनी तळेगाव दाभाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड, नादब्रह्म संस्था, अथर्व थिएटर्स, दिशा फाउंडेशन, संस्कार भारती, नाटक घर, द बॉक्स, नाटक कंपनी आसक्त पुणे, महाराष्ट्र कल्चर सेंटर (एमसीसी) आदी संस्थांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा ‘रंगानुभूती’ हा महोत्सव आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश अशा देशाच्या विविध राज्यांतील कलाकार सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरवासियांना चांगल्या प्रकारची सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. हा महोत्सव ग.दि. माडगूळकर या नाट्यगृहात रंगतोय, ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची बाब आहे. कारण ग.दि.मा हे केवळ गीतकार किंवा लेखक नव्हते तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी होते. त्यांच्या नावाने उभ्या केलेल्या या नाट्यगृहात हा महोत्सव होत असल्याने या कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी- चिंचवड महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक धोरणानुसार शहरामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यास येथील महापालिकेचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. या माध्यमातून नवकलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जात आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे केवळ आता औद्योगिक शहर म्हणून नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये झपाट्याने वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या शहरामध्ये अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक, साहित्यिक, कवी घडत आहेत. मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचे काम या शहराने केले आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
मराठी भाषा व मराठी नाटकाचे महत्त्व अधोरेखित करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मराठी भाषेसाठी राज्य सरकारने नवीन विभाग सुरू केला आहे. मराठी माणसाचे पहिले प्रेम हे नाटक आहे. मराठी माणूस हा नाटकवेडा असून खऱ्या अर्थाने त्याने नाट्यचळवळ जिवंत ठेवली आहे. मराठी नाटक हे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब आहे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. ग्रामीण भागातील नाट्यगृह ही दर्जेदार असावीत, तेथे उत्तम सोयीसुविधा असाव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातून चांगले कलाकार घडण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चित्रप्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक ‘रंगानुभूती’ या महोत्सवाच्या निमित्ताने ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील कलादालनात पिंपरी- चिंचवड शहराचा सांस्कृतिक प्रवास दर्शवणारी चित्रकृती तसेच अप्रतिम चित्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. शहरातील उत्तम चित्रकारांची अभिनव कलाकृती येथे प्रदर्शित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले. या माध्यमातून नवकलाकारांच्या कलेला वाव देण्याचे काम करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.