शरद पवार यांनी आजवर अनेक निवडणूक पाहायला आहेत. मात्र, काल झालेल्या एका प्रचार सभेत, शरद पवार यांनी, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. हे पाहता ते प्रचाराची पातळी, खाली घेऊन गेले आहेत. अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ बाणेर येथील सभा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व सध्याचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कोथरूड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, पुणे शहराचे खासदार गिरीश बापट, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर तसेच आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की, राज्यात निवडणुकीचा प्रचार सुरू असून प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यातून शरद पवार यांनी खालच्या पातळी जाऊन सभेत ‘ते’ विधान केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते पुढे म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि गुलाब नबी आझाद या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जन्म एका ठिकाणी आणि उमेदवारीसाठी ते दुसर्‍या ठिकाणी उभे राहतात. ही परंपरा काँग्रेस पक्षाने आणली असून चंद्रकांत पाटील, तर आपल्यातील असल्याचे सांगत, बाहेरचा उमेदवार म्हणणार्‍यांना त्यांनी टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोथरूड विभागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे राज्यात प्रचंड मतांनी निवडून येणारे उमेदवार राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमच्या धनंजय मुंडेला, कसे घेतले ते सांगा अगोदर : रावसाहेब दानवे पाटील
सत्ताधारी पक्षाकडून ईडीचा धाक दाखवून, विरोधकांना भाजपात घेतले जात आहेत. अशी चर्चा विरोधकांकडून सुरू आहे. आहो शरद पवार यांनी कृष्णराव भेगडे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेत्यांना इतर पक्षातून राष्ट्रवादीमध्ये ऐकेकाळी प्रवेश दिला होता. तेव्हा त्या सर्वांना कोणता धाक देऊन घेतले, आमच्या धनंजय मुंडेंना देखील घेतले. आता सांगा धनंजय मुंडेला कोणता धाक दाखवून घेतले? आता एक ना एक दिवस अजित पवार तुम्हाला देखील तिथं जाऊन बसावे लागणार आहे. अशा शब्दात रावसाहेब दानवे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. जर आपण काही केले नसेलच, तर घाबरता का अशा शब्दात विरोधकांना त्यांनी सुनावले.

माझ्या उमेदवारीची चर्चा करण्याअगोदर स्वतःचा विचार करा : चंद्रकांत पाटील
माझ्या उमेदवारीवरून फार चर्चा झाली. त्यात राज्याचे महत्त्वाचे नेते म्हणजे शरद पवार यांनी स्वतः चा बारामती लोकसभा मतदार संघ सोडून एक निवडणूक माढा मतदार संघातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवाय लोकसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने, त्यांनी निवडणूक देखील लढवली नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा विचार करावा. मी १२ वर्षांपासुन पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करत आहे. या अंतर्गत पाच जिल्ह्यांची निवडणूक लढवली आहे. त्यामध्ये विजयी देखील झालो आहे. हे काय गोट्या खेळणे आहे का? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तर निवडणुकीच्या अगोदरच नागरिकांनी रॅली दरम्यान अंगावर गुलाल उधळला आहे. त्या सर्व नागरिकांचे मी आभार मानतो असेही ते म्हणाले.