पुणे : दोन इंचांपासून ते दोन फुटांपर्यंतचे वैशिष्ट्यपूर्ण माऊथ ऑर्गन, चांदीची पॉकेट घड्याळे, कॅमेरे, जमिनीतील खनिजे, शिरस्त्राण, महाभारत आणि रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे, विड्याची पाने ठेवण्याचे नक्षीदार डबे, धातूंपासून बनविलेल्या आजोबांच्या काठ्या, शंख-शिंपले, विविध प्रकारचे रेडिओ, हिटलरचा पत्रव्यवहार, शंभर वर्षांपूर्वीच्या दिनदर्शिका अशा वैविध्यपूर्ण दुर्मीळ वस्तूंचा खजिना इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्सतर्फे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाद्वारे पुणेकरांसाठी खुला झाला.
बालगंधर्व कलादालनात आयोजित प्रदर्शनाचे भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम मुडे, अजित गाडगीळ, संस्थेचे किशोर चांडक, कमलेश मोतीवाले, श्याम मोटे, शशिकांत ढोणे, शरद बोरा, डॉ. अजित वर्तक या वेळी उपस्थित होते. रविवारपर्यंत (२५ मे) सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
‘कोणत्याही छंदाद्वारे तुमचे आयुष्य समृद्ध होत असते. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस या संस्थेतर्फे संग्रहित केल्या गेलेल्या दुर्मीळ वस्तूंच्या माध्यमातून मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणाच जपल्या गेल्याचे गौरवोद्गार प्रदीप रावत यांनी काढले.
ते म्हणाले, ‘आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध करायचे झाल्यास छंद आणि व्यासंग याची सांगड घालणे आवश्यक असते. छंदाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करणे, तो जोपासणे आणि तो खजिना सर्वसामान्यांसाठी विनामूल्य पाहण्यास खुला करणे हे चांगल्या अर्थाने पछाडलेपण आहे. सर्वसामान्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या छंदाची रूजवण होण्यासाठी सोसायटीतर्फे प्रदर्शनांच्या माध्यमातून गेली ३० वर्षे करण्यात येणारे प्रयत्न पाहिल्यावर सभासदांपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.
या प्रदर्शनानिमित्त गुणवंत शहा लिखित ‘एंशियंट इंडिया अँड वेदिक सायन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसचे अध्यक्ष किशोर चांडक यांनी केले. श्याम मोटे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. शशिकांत ढोणे यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या वस्तूंचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. विनायक आवटे यांनी सूत्रसंचालन केले. शरद बोरा यांनी आभार मानले.