पुणे : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व १ लाख २५५ व तडजोडचे ३८ हजार ५७० असे एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली काढण्यात आले आहेत.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ८ हजार ८१९, तडजोड पात्र फौजदारी ३१ हजार ५३७, वीज देयक ३२९, कामगार विवाद खटले १८, भुसंपादन १११, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १६३, वैवाहिक विवाद ७४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ९९४, इतर दिवाणी ५१४, इतर २ हजार ६७३, महसूल ७ हजार ७३१, पाणी कर ८४ हजार ८६०, ग्राहक वादविवाद २ अशी एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ९७ हजार ६४४ प्रलंबित प्रकरणांमधून ३८ हजार ५७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ३२० कोटी ६८ लक्ष १२ हजार ४०७ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व २ लाख ४२ हजार ९८७ दाव्यापैकी १ लाख २५५ दावे निकाली काढण्यात येऊन २५६ कोटी ७० लाख ९८ हजार ७४९ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ५७७ कोटी ३९ लाख ११ हजार १५६ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.