पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील उंदरांच्या सुळसुळाटानंतर महापालिकेला जाग आली आहे. शहरातील सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ‘कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली आहे. शहरातील सर्व नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोल केले जाईल. नाट्यगृहात उंदीर येऊ नयेत म्हणून काही औषधे वापरली जातील. सांस्कृतिक केंद्र परिसरात स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील,’ असे आश्वासन सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी दिले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे काही दिवसांपूर्वी नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षागृहात एका महिला प्रेक्षकाला नाट्यगृहातील उंदराचा उपद्रव सहन करावा लागला. नाट्यगृहातील या उंदराला बाहेर काढण्यासाठी जवळपास २० मिनिटांचा कालावधी लागला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या व्यवस्थापनाचे वाभाडे निघाले. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.