पुणे : पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन खरेदी प्रकरणातील निलंबित पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे सर्व निर्णय, आदेशांची फेरतपासणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतला असून यात काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीची १३ एकर जागा चुकीच्या पद्धतीने कुळांच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डुडी यांनी येवले यांचे निलंबन करावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाने त्यांचे निलंबन केले होते. ‘मुंढवा आणि बोपोडी येथील प्रकरणांमध्ये येवले दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी समितीने नोंदविलेल्या विविध मुद्द्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पदावनत, वेतनवाढ रोखणे किंवा अन्य प्रशासकीय दंडात्मक कारवाई केली जाईल. मुंढव्यातील जमिनीचे हस्तांतर प्रत्यक्षात झालेले नाही. तहसीलदार येवले यांनी दिलेले आदेश प्रांताधिकाऱ्यांकडून रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.