मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी सभा पार पडली. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला होता. सभेदरम्यान, राज ठाकरेंनी दौरा स्थगित करण्याचे कारण देखील सांगितले. मात्र भाषणाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरेंनी सभेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावून घेतले. या विद्यार्थ्यांना दिसत नसल्याचे सांगत राज ठाकरेंनी त्यांची स्टेजवर बसण्याची सोय केली. भाषणानंतर या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी येणार का असा सवाल केला. त्याबाबत या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही उस्मानाबाद येथून राज ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी आलो होतो. पहिल्यांदाच राज ठाकरेंचे भाषण ऐकले. याआधीही इतरांची भाषणे ऐकली आहेत पण विशेष काही वाटले नाही. पण आज राज ठाकरेंचे भाषण ऐकून छान वाटले. जाताना त्यांनी आंदोलनसाठी याल का असे विचारले त्यावेळी आम्ही कुठेही यायला तयार आहोत असे म्हटले,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

“राज ठाकरे आम्हाला स्टेजवर बोलवतील अशी कल्पनासुद्धा नव्हती. त्यांनी जेव्हा स्टेजवर बोलवले तेव्हा मला विश्वास बसला नाही. जाताना राज ठाकरेंनी हात मिळवले तेव्हा जी प्रेरणा मिळाली ती नक्कीच मला उपयोगी पडेल,” असे पिंपरीवरुन आलेल्या करणने म्हटले.

दरम्यान, अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी हा दौरा रद्द केल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्यानंतर पुण्यामध्ये अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर अयोध्येला येऊ देणार नाही हे प्रकरण सुरु झाले. मी हे पाहत होतो. मला उत्तर प्रदेशातूनही माहिती मिळाली. एक वेळ अशी आली की मला समजले की हा सापळा आहे आणि यामध्ये अडकले नाही पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. ज्यांना माझी अयोध्यावारी खुपली त्यांनी सगळ्यांनी मिळून हा आराखडा आखला,” असे राज ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला रामजन्मभूमीचे दर्शन घ्यायचे होतेच पण जिथे कारसेवकांना मारले गेले तिथल्या जागेचेही दर्शन घ्यायचे होते. राजकारणामध्ये अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने ठरवले असते तर महाराष्ट्रातून हजारो मनसैनिक अयोध्येला आले असते. तिथे जर काही झाले असते तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. ऐन निवडणुकीच्या वेळी हे काढले असते आणि इथे त्यावेळी कोणीच नसते. हा सगळा सापळा होता. एक खासदार उठून मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे शक्य आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी केला.