संजय जाधव, लोकसत्ता

पुणे : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आळंदी परिसरात जास्त संख्येने असे रुग्ण आढळले होते. यातील ५७ रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) तपासले होते. त्यात एंटेरो विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत, असा अहवाल संस्थेने आरोग्य विभागाला दिला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यामुळे एनआयव्हीने आळंदीतील ग्रामीण रुग्णालयातून २७ आणि तीन निवासी वारकरी शिक्षा संस्थांमधील २६ असे एकूण ५३ रुग्णांचे नमुने घेतले होते. यात या रुग्णांचे डोळे आणि घशातील द्रव पदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले होते. डोळे आलेल्या रुग्णांचे हे नमुने होते. त्यांची तपासणी एनआयव्हीने करून याबाबत आरोग्य विभागाला अहवाल दिला आहे.

आणखी वाचा-एकवीस वर्षांनी तो परतला मायदेशी! मनोरुग्ण बांग्लादेशी तरुणाची कहाणी

एनआयव्हीच्या अहवालानुसार, या नमुन्यांची ॲडिनो विषाणू आणि एंटेरो विषाणूसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. एकूण ५३ पैकी ३५ जणांच्या डोळ्यातील द्रव पदार्थांच्या नमुन्यात एंटेरो विषाणू आढळून आले. या विषाणूचा नेमका उपप्रकार तपासण्यात येत आहे. याच वेळी घशातील द्रव पदार्थांच्या ४३ नमुन्यांपैकी २६ मध्ये एंटेरो विषाणू आढळले. डोळे आणि घशातील द्रवपदार्थ अशा दोन्हींमध्ये एंटेरो विषाणू आढळलेल्या नमुन्यांची संख्या १८ आहे. तसेच, जीवाणूंमुळे हे घडत आहे का, हे तपासण्यासाठी नऊ नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात या वर्षी आतापर्यंत डोळ्याची साथ आलेले ८७ हजार ७४१ रुग्ण आढळले आहेत. दर वर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ येते. वातावरणातील बदलामुळे यंदा रुग्णसंख्या मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. असे असले, तरी उपचारानंतर ४ ते ५ दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. -कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य सेवा