पुणे : शिक्षण आयुक्तालयात मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या ८० टक्के पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यात गट क संवर्गातील एकूण २३ पदे भरली जाणार असून, त्यासाठी २३ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतील परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट क संवर्गातील मुख्य लिपीक ६, वरिष्ठ लिपीक १४, निम्नश्रेणी लघुलेखक ३ अशी एकूण २३ पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रांवर घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २३ मार्चपासून सुरू होणार आहे, तर अंतिम मुदत ८ एप्रिल आहे. अर्ज सादर करताना तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित न झाल्यास किंवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेल्यास त्या जिल्हा परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या केंद्रावर केली जाईल. या पदांसाठीची पात्रता आणि अन्य माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.