scorecardresearch

खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावर तोडगा काढावा ; आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील यांची सूचना

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून र्विकास करणे आवश्यक आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून र्विकास करणे आवश्यक आहे. त्यामध्येच बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासनाने विरोधाचे कारण लक्षात घेऊन खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी घेतला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, आशुतोष वैशंपायन यांच्यासह चित्रपट आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्वांना उत्तम सुविधा पुरविणे काळाची गरज आहे.‌ त्यासाठी नदीसुधार प्रकल्प असो किंवा बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास प्रकल्प असो तो योग्य पद्धतीने आणि नियोजित वेळेत साकारणे महत्त्वाचे आहे. बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे, शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. पुनर्विकासात नाट्य संस्कृतीच्या जोपासनेसह, नव्या पिढीमध्ये मराठी नाट्य क्षेत्राबद्दल ओढ निर्माण व्हावी, यासाठीचे सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुनर्विकास प्रकल्पात जागेचा व्यवसायिक कारणांसाठी वापर होणार नाही.
नव्या नाट्यगृहाच्या पुनर्विकासात एक हजार, पाचशे आणि तीनशे आसन क्षमतेची नाट्यगृहे उभारण्यात येणार असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सध्या पुनर्विकासासाठी जो विरोध होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित रहावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून, यावर तोडगा काढावा, आणि किमान पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यल्प दरात महापालिकेसह खासगी नाट्यगृहे नाट्यरसिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Redevelopment balgandharva theater resolved consultation private theater operators chandrakant patil suggestion review meeting pune print news amy

ताज्या बातम्या