पावलस मुगुटमल

पुणे : उन्हाचा चटका तीव्र असल्याने सध्या राज्यात धरणांच्या साठय़ात झपाटय़ाने घट होत आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये राज्यात अनेकदा उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. या कालावधीत धरणांतील साठय़ात सुमारे १४ टक्क्यांनी घट झाली. मार्चच्या सुरुवातीला ७१ टक्क्यांवर असलेला एकूण उपयुक्त पाणीसाठा आता ५७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नागपूर विभागामध्ये पूर्वीपासूनच पाणीसाठा कमी आहे. त्यात आता नाशिक विभागाचीही भर पडली असून, या दोन्ही विभागांत कमी पाणीसाठा आहे. पुणे विभागात मात्र अद्यापही राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

मार्चच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. गेल्या सुमारे दीड महिन्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई परिसहरासह कोकण विभागामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. बहुतांश शहरांत कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेला. विदर्भात अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी भागांत देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे उन्हाच्या तीव्र झळांमुळे पिण्यासह शेतीसाठीही पाण्याची मागणी वाढलेली आहे. त्याचप्रमाणे बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यातून धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट सुरू असल्याचे दिसून येते. उन्हाळय़ाच्या हंगामातील आणखी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

जूनमध्ये मोसमी पाऊस कधी बरसेल याची शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत आता चिंता वाढत आहे. राज्यातील छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांमध्ये सध्या ५७.८३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो सुमारे दहा टक्क्यांनी अधिक असला, तरी सर्वच विभागात पाणीसाठा समान नाही. नागपूर आणि नाशिक विभागामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आणि ५० टक्क्यांच्या खाली पाणीसाठा असून, त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिक, नगर, जळगाव आदी जिल्ह्यांतील धरणांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात ४८.७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ४९.२८ टक्के होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांतील धरणांच्या नागपूर विभागात सध्या ४५.४७ टक्के पाणी आहे. गतवर्षी ते ५२ टक्के होते. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील धरणांच्या पुणे विभागात मात्र राज्यातील सर्वाधिक आणि गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक म्हणजेच ६३ टक्के, तर त्यापाठोपाठ औरंगाबाद विभागात ६२ टक्के पाणाीसाठा आहे.

विदर्भात ४४ अंशांपुढे तापमान

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश ते मध्य प्रदेशापर्यंत उत्तरेकडील सर्वच भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट आल्याने विदर्भातही उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. अकोला, वर्धा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या भागांमध्ये कमाल तापमान ४४ अंशांपुढे गेले आहे. नागपूर, वर्धा आदी भागांत तापमान ४४ अंशांजवळ पोहोचले असल्याने उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. २० एप्रिलपर्यंत या भागात उष्णतेची लाट राहणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडय़ासह राज्यातील उर्वरित भागातही तापमान अधिक राहणार आहे. मराठवाडय़ातील परभणी, मध्य महाराष्ट्रातील सोलापुरात तापमानाचा पारा ४२ अंशांपार गेला आहे.