पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे ३ हजार ९०० हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती-सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत असून, आराखड्यातील मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकला जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी एससीईआरटीने तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार करून जाहीर केला. नव्या धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठीच्या आराखड्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांचे शिक्षण, शाखानिहाय शिक्षणाची पद्धती मोडीत काढणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, शारीरिक शिक्षणाचे अध्यापन अशा विविध तरतुदींसह प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या अध्यायाचे पाठांतर, विद्यार्थ्यांना भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख करून देण्याबाबत सुचवण्यात आले होते. त्याशिवाय या आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आल्याने हा आराखडा वादात सापडला होता. या वादाला राजकीय वळणही आले होते. या विरोधात आंदोलनेही झाली होती, तसेच आराखड्यातील धार्मिक शिक्षणाचा आग्रह, मनुस्मृतीचा उल्लेख यासह विविध तरतुदींवर आक्षेप घेण्यात आले होते. अभ्यासक्रम आराखडा जाहीर करताना या अभ्यासक्रम आराखड्यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक अशा विविध घटकांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – शहरबात: तोतया डाॅक्टरांना रोखणार कोण?

हेही वाचा – मोहरमनिमित्त पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत आज बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार म्हणाले, की अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे ३ हजार ९०० हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक हरकत-सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत आहे. त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे. आराखडा अंतिम करून तो सुकाणू समितीला सादर केला जाणार आहे. अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकला जाणार आहे.