लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील वर्षभरात केलेली विकास कामे, राबविलेले नवीन उपक्रम याची माहिती राज्य सरकारला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विभागप्रमुखांना आयुक्त शेखर सिंह यांनी फैलावर घेतले. दहा महिन्यापासून आपण काही गोष्टी बघत आहोत, यापुढे अशा बाबी खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत विविध विभागाच्या माध्यमातून नवीन उपक्रम, योजना, विकास कामांसह आदींची माहिती सरकारने आठ दिवसांपूर्वी मागितली आहे. त्यानुसार आयुक्त सिंह यांनी पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागात गेल्या वर्षभरात केलेल्या चांगल्या कामाची फोटोसह माहिती देण्याचे सांगितले. याबाबत विभाग प्रमुखांच्या ग्रुपमध्येही माहिती देण्यासाठी नमुना टाकण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
आणखी वाचा-डॉ. अनिल रामोड यांनी निकालासाठी प्रलंबित ठेवलेल्या ३७४ प्रकरणांचे गूढ; ‘सीबीआय’कडून चौकशी
माहितीसाठी राज्य सरकारचे सचिव आयुक्तांच्या सतत संर्पकात होते. मात्र, विभाग प्रमुखांनी माहिती दिली नसल्याचे आयुक्त सिंह यांच्या मंगळवारी निदर्शास आले. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना फैलावर घेतले. तसेच मी मागील दहा महिन्यापासून काही गोष्टी बघत आहे. मात्र, यापुढे अशा बाबी खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.