लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला राज्यात सुमारे ४५४६ मालमत्तांची दस्त नोंदणी करण्यात आली. यामध्ये दुकाने, सदनिका, जमीन आदींचा समावेश आहे. या माध्यमातून आठ कोटी सात लाख रुपयांचा महसूल जमा झाला.

राज्यातील मोजकी दस्तनोंदणी कार्यालये शनिवारी आणि रविवारी सुरू राहणार आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे कल असतो. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील ५४३ पैकी मोजकीच दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवली होती. राज्यभरातून अभिहस्तांतरणपत्र, बक्षीसपत्रे, गहाणखत आदी ४५४६ दस्त नोंदविले गेले. त्यातून सुमारे आठ कोटी सात लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा- पुणे: अक्षय्य तृतीयेला सोन्याला झळाळी

दरम्यान, सरलेल्या आर्थिक वर्षात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांतून तब्बल ४३ हजार कोटींचा महसूल गोळा केला. चालू आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) आतापर्यंत सुमारे १५०० कोटींचा महसूल मिळाला आहे. एप्रिलअखेरीस दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळेल, असा विश्वासही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून व्यक्त करण्यात आला.