किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि कथकसम्राट पं. बिरजूमहाराज या दोन दिग्गज कलाकारांमधील ऋणानुबंध बुधवारपासून (४ फेब्रुवारी) भरविण्यात येणाऱ्या ‘भेटी लागी जीवा..’ या छायाचित्र प्रदर्शनातून उलगडणार आहेत.
पं. भीमसेन जोशी आणि पं. बिरजूमहाराज या दोघांचाही ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. हे दुहेरी औचित्य साधून पं. बिरजूमहाराज यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू प्रभा मराठे यांनी कलाछाया कल्चरल सेंटरतर्फे ‘भेटी लागी जीवा..’ या छायाचित्र प्रदर्शनाचा योग जुळवून आणला आहे. राम अभ्यंकर, सतीश पाकणीकर, आनंद परोपकारी, जगदीश चाफेकर आणि ए. व्ही. आगाशे या छायाचित्रकारांनी टिपलेल्या पं. भीमसेन जोशी आणि पं. बिरजूमहाराज यांची दुर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. संस्थेच्या दर्पण आर्ट गॅलरी येथे बुधवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता अॅडगुरू भरत दाभोलकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ कथक नर्तक-गुरू तिरथ अजमानी आणि अमेरिकेतील ईस्ट-वेस्ट सेंटरचे माजी उपाध्यक्ष डॅनियल बर्मन या वेळी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने कलाछाया संस्थेच्या विद्यार्थिनी ‘स्वर भाव रंग’ कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगावंर कथक नृत्याविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्यसंरचना प्रभा मराठे यांची आहे. उत्तरार्धात पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र-शिष्य श्रीनिवास जोशी यांचे गायन होणार आहे. ‘भेटी लागी जीवा’ हे छायाचित्र प्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी येथे ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे.