विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अवकाळी पावसाची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत खाली गेल्याने रात्री आणि पहाटे पुन्हा गारवा अवतरला आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ-उतार होणार आहेत. दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे २ मार्चला विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या आठवडय़ापासून राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती. बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला होता. कमाल तापमानातही वाढ झाल्याने हवेतील गारवा नाहीसा होऊन उकाडा जाणवू लागला होता. उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र असतानाच गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात घट होऊ लागल्याने संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवतो आहे. गुरुवारी विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी, तर मराठवाडय़ात ३ ते ४ अंशांनी घट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १ ते ३ अंशांनी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी चांगलाच गारवा जाणवतो आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाचा पारा १ ते ३ अंशांनी खाली आल्याने दुपारी उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे.

उत्तरेकडील राज्यामध्ये सध्या किमान तापमानात घट होऊन थंडी अवतरली आहे. तेथून राज्याच्या दिशेने येणारे थंड वारे आणि राज्यातील कोरडय़ा हवामानामुळे गारव्यात वाढ होत आहे. गुरुवारी नगर येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २ मार्चला विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

किमान तापमान  : मुंबई (कुलाबा) २०.५, सांताक्रुझ १८.२, अलिबाग १८.२, रत्नागिरी १६.५, पुणे १०.६, जळगाव १५.०, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १०.४, मालेगाव १४.८, नाशिक १२.२, सांगली १३.६, सातारा ११.१, सोलापूर १६.६, औरंगाबाद १५.०, परभणी १५.४, नांदेड १५.५, बीड १५.०, अकोला १६.४, अमरावती १४.४, बुलडाणा १६.५, ब्रह्मपुरी १५.९,चंद्रपूर १९.०, गोंदिया १४.५, नागपूर १५.६, वाशिम १५.०, वर्धा १५.६ आणि यवतमाळ १५.४.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repeat the state due to northern winding
First published on: 01-03-2019 at 04:36 IST