लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: ‘पॉवर ग्रीड’च्या वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून पुणे, पिंपरी शहरासह चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. शुक्रवारी पहाटे एक ते सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रभर त्रास सहन करावा लागला.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (१८ मे) सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.

आणखी वाचा-घरकाम करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे आले अंगलट

दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे महापारेषणचे अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडल्याने तसेच भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत कोथरूड, एसएनडीटी, औंध, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी, बावधन, मॉडेल कॉलनी, पाषाण या भागांमध्ये एक तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागले.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी तांत्रिक बिघाड झाला होता. पाहणीमध्ये तळेगाव नजिकच्या करंजविहिरे गावाजवळ अतिउच्चदाबाची एक वाहिनी तुटून दुसऱ्या वाहिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रात्रीच अदानी कंपनी आणि महापारेषणचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. परंतु, या बिघाडामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल ३९६ मेगावॅट विजेचे वहन बंद पडले होते. परिणामी पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी तसेच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर, संपूर्ण प्राधीकरण आणइ आकुर्डीमधील ५० टक्के भाग असा एकूण ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.

आणखी वाचा-आंध्र प्रदेशातील सूत गिरणीत गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक

महापारेषण आणि महावितरणचे सर्व वरिष्ठ अभियंता सातत्याने एकमेकांशी संपर्कात होते. एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी आणि तांत्रिक बिघाडामुळे ३९६ मेगावॅट विजेचे थांबलेले वहन या प्रतिकूल परिस्थितीत भारव्यवस्थापनाद्वारे वीजग्राहकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू होते. यामध्ये साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला. महापारेषण आणि महावितरणचे उपकेंद्र टप्प्याटप्प्याने सुरू होत गेले त्याप्रमाणे ग्राहकांचा वीजपुरवठा देखील सुरळीत होत गेला.शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत पॉवर ग्रीडच्या वीजवाहिन्यांमुळे खंडित झालेल्या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restoration of power supply to chakan midc along with pune and pimpri city pune print news vvk 10 mrj
First published on: 19-05-2023 at 14:07 IST