पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या वादातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांसाठी कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनांसाठीची कार्यपद्धती निश्चित केली असून, विद्यार्थी संघटनांना उपक्रम, कार्यक्रमांसाठी किमान पाच दिवस आधी पूर्वपरवानगी, निश्चित केलेल्या जागेतच कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्याचे बंधन घालण्यात आले असून, विद्यापीठाचे नुकसान न होण्याबाबतचे लेखी हमीपत्रही द्यावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध संघटनांमध्ये वाद होऊन हाणामारीची घटना झाली होती. त्यानंतर विद्यापीठात परस्परांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. त्यामु‌ळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या विनंतीनंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी लागू केली होती. तसेच विद्यापीठ, पोलिसांनी संघटनांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. त्यात संघटनांसाठी कार्यपद्धती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कार्यपद्धती तयार करून त्याचा मसुदा जाहीर केला आहे.

हेही वाचा – शिरुरमध्ये कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील यांच्यात लढत? माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांसोबत?

विद्यापीठाने तयार केलेल्या कार्यपद्धतीच्या मसुद्यानुसार विद्यापीठाच्या आवारात कोणतेही उपक्रम, आंदोलन, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. पूर्वपरवानगीचा अर्ज किमान पाच दिवस आधी द्यावा लागणार आहे. पूर्वपरवानगीचा अर्ज दिला आणि त्याची पोहोच घेतली म्हणजे परवानगी दिली असे ग्राह्य धरले जाणार नाही. परवानगीसाठीचा अर्ज ऐनवेळी किंवा उशिरा दिल्यास परवानगी दिली जाणार नाही, तरीही कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन केल्यास, त्यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित संयोजकांची असेल. कोणत्याही कार्यक्रम, उपक्रमांसाठी विद्यापीठातील संविधान स्मारकाशेजारील मोकळी जागा निश्चित करून देण्याचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला आहे. पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याची प्रत विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला देणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय कार्यक्रम, उपक्रम केल्यास, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कार्यक्रम, उपक्रमावेळी विद्यापीठाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे नुकसान होणार नाही याबाबतचे लेखी हमीपत्रही द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात धुक्यासह गारठा वाढणार, कसं असेल हवामान?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटनांबरोबर ८ जानेवारीला बैठक

विद्यापीठाने जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी संघटनांसाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यासाठीची बैठक ८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठात होणार असल्याची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली.