पुणे : भारतीय हवाई दलातील कर्तबगार मराठी अधिकारी असा लौकिक असलेले निवृत्त एअर कमोडोर मधुकर कृष्ण मराठे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. हवाई दलातील पथकाने मानवंदना दिल्यानंतर मराठे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे अश्विनी करंदीकर आणि अंजली कुलकर्णी या दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
नाशिकरोड येथील पुरुषोत्तम रुंगठा विद्यालय, पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे हुशार विद्यार्थी असा लौकिक असलेल्या मधुकर मराठे यांची हवाई दलात अधिकारी म्हणून निवड झाली. तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना दोनदा विशिष्ट सेवा पदकाने आणि एकदा अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. क्रीडाप्रेमी मराठे राष्ट्रीय रोईंगपटू होते.
हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर दिलीप भिडे यांच्या डी. बी. इलेक्ट्रॉनिक्समध्ये संचालक म्हणून मराठे यांनी काम केले. त्यांच्यातील व्यवस्थापन आणि उद्योजकतेतील गुणवत्तेमुळे एका छोटय़ा संस्थेने दशकभरात मध्यम आकाराचा उद्योगसमूह म्हणून वाटचाल केली. गेली काही वर्षे उगवत्या उद्योजकांसह त्यांनी संस्थेचा व्याप चीनपर्यंत नेला होता.