पुणे : धनकवडीत रस्त्यात गप्पा मारत थांबलेल्या टोळक्याला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्याने दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत निवृत्त पोलिसाच्या डोळ्याला दुखापत झाली, तसेच नाकातून रक्तस्त्राव झाला. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवीण यशवंत पाटील (वय ५६, रा. पद्मछाया सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील गौतम कसबे (वय ३०), जतीन मधुकर बोळे (वय २२, दोघे रा. धनकवडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाटील यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे जानेवारी महिन्यात पुणे पोलीस दलात निवृत्त झाले. त्यांची मुले परदेशात नोकरी करतात. पाटील आणि त्यांची पत्नी चव्हाणनगर भागताील साेसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (२४ जून) रात्री दहाच्या सुमारास पाटील दाम्पत्य दुचाकीवरुन निघाले होते. त्या वेळी राजीव गांधी वसाहत परिसरात सुनील कसबे, जतीन बोळे आणि साथीदार हे रस्त्यात दुचाकी लावून गप्पा मारत थांबले होते.
त्या वेळी पाटील यांनी त्यांना दुचाकी बाजूला काढण्यास सांगितले. रस्त्यात गाडी लावल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत असल्याचे पाटील यांनी आरोपींना सांगितले. या कारणावरुन आरोपींनी पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. कसबे आणि साथीदारांनी पाटील यांना दांडक्याने मारहाण केली,तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत पाटील यांच्या डोळ्याला दुखापत झाली, तसेच त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. त्या वेळी सोसायटीतील महिलांना आरडाओरडा केला. रहिवासी जमल्यानंतर आराेपी तेथून पसार झाले. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी आरोपी कसबे, बोळे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना नाेटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले.