लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पुणे विभागाने मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात तब्बल २ हजार ८३५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. वर्षभरात महसुलात ४२.५ टक्के म्हणजेच ८४६ कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागाने महसुलाचे ११० टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहन नोंदणी, हरित कर, वाहन परवाना, दंडात्मक कारवाई आणि पसंती क्रमांक यासह वाहन निगडित इतर सेवांच्या माध्यमातून महसूल मिळतो. आरटीओच्या पुणे विभागात पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर आणि अकलूज ही कार्यालये येतात. पुणे विभागाने मागील आर्थिक वर्षात २ हजार ८३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्याआधीच्या वर्षात हे उत्पन्न १ हजार ९८९ कोटी रुपये होते.

आणखी वाचा- पुणे: हवेली तहसील विभाजनाच्या निर्णयाची प्रतीक्षाच

पुणे विभागाच्या महसुलात पुणे आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयांचा सर्वाधिक हिस्सा आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुणे कार्यालयाला १ हजार ५२४ कोटी रुपये आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयाला ८७४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याआधीच्या वर्षात २०२१-२२ मध्ये पुणे कार्यालयाला १ हजार ७३ कोटी रुपये आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयाला ६२१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यात मागील वर्षात अनुक्रमे ४२ आणि ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोलापूर कार्यालयाला मागील आर्थिक वर्षात १९६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याआधीच्या वर्षात हे उत्पन्न १४२ कोटी होते. त्यात आता ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकलूज कार्यालयाला मागील आर्थिक वर्षात ७९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्याआधीच्या वर्षात ते ५८ कोटी होते. त्यात ३६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती कार्यालयाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ

बारामती कार्यालयाच्या उत्पन्नात मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. कार्यालयाला आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ९४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यात मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ६८ टक्क्यांची वाढ होऊन ते १६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.