या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला यंदाच्या आर्थिक वर्षांत (२०२१-२२) बाजार शुल्काच्या माध्यमातून (सेस) ५१ कोटी ४६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत (२०२०-२१) बाजार समितीला सेसच्या माध्यमातून ३८ कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत बाजार शुल्काच्या माध्यमातून १४ कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या पाच वर्षांची सरासरी पाहता बाजार समितीला बाजारशुल्काच्या माध्यमातून वर्षांकाठी ४३ कोटी ५७ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षांत बाजार समितीला सेसच्या माध्यमातून ५१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पाच वर्षांचे उत्पन्न विचारात घेता यंदाच्या आर्थिक वर्षांत सेसच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाजार समितीचे सहसचिव राम घाडगे, उपसचिव शिवाजी गायकवाड, सहायक सचिव वामन तुपे, बाळासाहेब तळेकर, नीलिमा भोसले, फळ बाजार विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, भुसार विभागाचे प्रशांत गोते, स्थापत्य विभाग प्रमुख प्रमोद तुपे, उपअभियंता अरिवद फडतरे आदी यावेळी उपस्थित होते.

२०२१-२२ या वर्षांत फळ विभागातून सहा कोटी ५९ लाख रुपये, तरकारी विभागातून नऊ कोटी ६६ लाख रुपये, कांदा-बटाटा विभागातून सात कोटी ५१ लाख रुपये असे २३ कोटी ७६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या तीन विभागातील शुल्क भरण्याचा सरासरी विचार घेता २१ टक्क्यांनी उत्पन्न वाढ झाली आहे. गूळ भुसार विभागातून बाजार शुल्कापोटी १९ कोटी ६९ लाख रुपये तसेच देखभाल शुल्कापोटी दोन कोटी ५८ लाख रुपये असे २१ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पार्किंग शुल्कातून सव्वा कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

बाजार शुल्क वाढीमागची कारणे

व्यापाऱ्यांकडून वर्षांतून एकदाच बाजार शुल्क भरण्यात येत होते. त्यावर विलंब शुल्क म्हणून १२ टक्के व्याज आकारण्यात आले. त्यामुळे दरमहा नियमित बाजार शुल्क भरण्यास सुरुवात झाली. मार्केट यार्डातील तरकारी, भुसार विभागात शेतीमाल किती प्रमाणात विक्रीस येतो याची नोंद ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. बाजार शुल्क भरण्याबाबत अडते संघटनेकडून अडत्यांना आवाहन करण्यात आले होते. बाजार समितीच्या उपाययोजनांमुळे बाजार शुल्कात वाढ झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue market charges increase income market committee ysh
First published on: 06-04-2022 at 00:02 IST