मतदारसंघ – पुणे

पुणे विधान परिषदेसाठीची निवडणूक काही दिवस बहुचर्चित झाली होती. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर या निवडणुकीची औपचारिकताच बाकी होती. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले पुन्हा सहज निवडून आले.

[jwplayer CdTbNsE8]

अनिल भोसले यांनी पहिल्या फेरीतच ४४० मते मिळवत विजय नोंदवला. भाजपचे अशोक येनपुरे यांना १३३ तर काँग्रेसचे संजय जगताप यांना ७१ मते मिळाली. विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक होते. त्यात माजी आमदार लांडे यांनी उमेदवारीसाठी चंगच बांधला होता. प्रत्यक्षात अनिल भोसले यांची उमदेवारी जाहीर झाली आणि लांडे यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही, तर त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लांडे यांनी आधी प्रतिनिधी पाठवला. त्यामुळे अर्ज मागे घेण्याचे पत्र स्वीकारण्यात आले नाही. कारण उमेदवाराने स्वत: समक्ष येऊन पत्र द्यावे लागते. माघारीचे वेळ निघून गेल्याने मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम राहिले. तोपर्यंत लांडे यांचं बंड कायम होते. मात्र बंडखोरीसाठी प्रसिद्ध असलेल्या लांडे यांची बंडखोरी पक्षाने गांभीर्याने घेतली आणि शरद पवार यांनी त्यात लक्ष घातल्यामुळे लांडे यांना ‘मी शरद पवार यांचाच कार्यकर्ता आहे. मी अनिल भोसले यांच्यासाठीच काम करणार’ असे त्याच दिवशी जाहीरपणे सांगावे लागले. लांडे यांचे बंड अशा प्रकारे शमले आणि निवडणुकीचा निकाल तेव्हाच स्पष्ट झाला.

घोडेबाजार नको अशी भूमिका घेत मनसेने या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात हा आदेश पुण्यातील नगरसेवकांनी पाळला, मात्र पिंपरीतील चारपैकी तीन नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावून मतदान केले. या निवडणुकीत मतांचा बाजार ठरलेलाच असतो, तसा तो या वेळीही झालाच. मात्र त्याचे प्रमाण तसे मर्यादितच राहिले.

पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोन आमदारांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपच्या गळाशी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळेच पिंपरीतील राष्ट्रवादीची मते मोठय़ा प्रमाणावर फुटतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण भाजपचे हे गणितही चुकले. येनपुरे यांच्यासाठी खासदार संजय काकडे यांनी ‘ताकद’ लावावी, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा होती, पण व्याहीच (अनिल भोसले) रिंगणात असल्याने नानांनी जादू केली नाही, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोन आमदारांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपच्या गळाशी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळेच  राष्ट्रवादीची मते मोठय़ा प्रमाणावर फुटतील, अशी शक्यता होती. येनपुरे यांच्यासाठी  संजय काकडे यांनी ‘ताकद’ लावावी, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा होती, पण व्याहीच (अनिल भोसले) रिंगणात असल्याने नानांनी जादू केली नाही, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे.

[jwplayer y8Pn2zMM]