बंद नळयोजना प्रकल्पाबाबत शेतक ऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाही
पिंपरी पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मावळ बंद नळयोजना प्रकल्पाबाबत शेतक ऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल आणि या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतक ऱ्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ, अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिली.
बंद नळ योजनेस विरोध करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनात तीन शेतक ऱ्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पवनानगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
बापट म्हणाले,‘‘ पिंपरी पालिका, जलसंपदा विभाग आणि मावळातील शेतक ऱ्यांशी चर्चा करूनच या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल. युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मृतांच्या वारसांना पिंपरी पालिकेत नोकरी देण्यात आली. मृत शेतक ऱ्यांचे स्मारक करण्यात येणार असून त्यासाठी राज्यसरकारकडून निधी देण्यात येईल.’’ आमदार भेगडे म्हणाले,‘‘गोळीबाराच्या घटनेमागचे सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. पवना धरणग्रस्तांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा.’’ दिगंबर भेगडे म्हणाले,की दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.