पुणे शहरात बाइक-टॅक्सी विरोधी आंदोलन समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा बंद करण्यात यावी या मागणीसाठी पुणे शहरातील हजारो रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आज आंदोलकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. मात्र या भेटीनंतर रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला.

नेमकं काय झालं?

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजमहलबाहेर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले. बाबा कांबळे आणि केशव क्षीरसागर यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. राज ठाकरेंसमोर आपल्याला बोलू न दिल्याने बाबा कांबळे यांनी संताप व्यक्त केला. रिक्षाचालकांची भूमिका आपल्याला मांडायची असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. यावर केशव क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा शाब्दिक वाद आणखीनच पेटला. यावेळी तिथे उपस्थित इतरांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

राज ठाकरेंनी पुन्हा बोलून दाखवली मतं मिळत नसल्याची खंत? निवेदन घेऊन आलेल्यांना म्हणाले, “आम्ही फक्त…”

राज ठाकरे भेटीत काय झालं?

बाइक टॅक्सीमुळे आमचं जगणं मुश्किल झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत.तुमचा शब्द कोणी टाळत नाही. आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे केली.

‘बेकायदा बाइक टॅक्सी बंद करा’; पुण्यात हजारो रिक्षाचालकांचे ठिय्या आंदोलन

“मी या संदर्भात संबंधितांसोबत बोलतो आणि तुम्हाला कळवतो. आज संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी नक्की बोलणं होईल,” असं राज यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर पुन्हा एका पदाधिकाऱ्याने यापूर्वी तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत असं सांगत आमचीही मदत करावी असं गाऱ्हाणं घातलं. यावर राज यांनी आपल्या आसनावरुन उठता उठता, “आम्ही फक्त प्रश्न सोडवयालाच असतो,” असं म्हटलं. राज ठाकरेंची ही पाच शब्दांची प्रतिक्रिया ऐकून उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.